gp panchayat

1  ते 33 नमुने

1  ते 33 (1 te 33 namune) नमुने ठेवणे आता ग्रामपंचायतीला बंधनकारक आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ६२ मधील तरतुदी नुसार ग्रामपंचायत १ ते २७ मध्ये नमुने किवा अभिलेखे ठेवले होते. महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता २०११ नुसार 1 te 33 namune  मध्ये ग्रामपंचायतीला लेखे अचूक ठेवणे बंधनकारक आहे. सदर नमुने लिहिणे व त्यात नोंदी घेणे आणि त्या कशा घ्य्वायाच्या याबाबतीत ग्राम पंचायत अधिकारी यांच्यात संभ्रम निर्माण होतो. त्यांची हि तांत्रिक अडचण सोडविण्याचा हा छोटाशा प्रयत्न करीत आहोत.

GP 1 TO 33

१ ते ३३ नमुने (1 te 33 namune) नोंदी घेणे करितामहाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता २०११ मधील प्रकरण तीन मध्ये नमूद केल्याप्रमाणे सर्वसाधारण वित्तीय तत्वाचे पालन करणे बंधनकारक आहे. निधीतून खर्च करताना वित्तीय औचित्याच्या सूत्राचे अनुपालन करण्यात यावे, याबाबत नियम महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता २०११ मध्ये दिले आहेत.

पंचायतीने पंचायतीचे लेखे १ एप्रिल रोजी सुरु होणाऱ्या प्रत्येक वित्तीय वर्षासाठी स्वतंत्र ठेवावेत.सर्व लेखा पुस्तके, अभिलेखे, नोंदवह्या व अहवाल यांची मजबूत बांधणी करावी. कोणत्याही परिस्थितीत लेखे सुट्या कागदावर किवा सैलपणे बांधलेल्या फाईल मध्ये ठेऊ नये.सर्व लेख पुस्तकाच्या पानांना किवा पृष्ठांना अनुक्रमांक द्यावेत.प्रत्येक पानावर पंचायतीची मुद्रा मुद्रांकित असावी. शेवटचे पृष्ठ सरपंच व ग्राम पंचायत अधिकारी यांनी प्रमाणित करून तशी सही करावी.

महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता २०११ नुसार १ ते ३३ नमुने (1 te 33 namune) ची माहिती खालीलप्रमाणे देण्यात येत आहे.

(१) नमुना – १ अर्थसंकल्प
(२) नमुना – २ पुनर्विनियोजन व नियतवाटप
(३) नमुना – ३ ग्रामपंचायत जमा व खर्च
(४) नमुना – ४ पंचायतीचे मत्ते व दायीत्वे
(५) नमुना – ५ सामान्य रोकडवही
(५ ) नमुना – ५ (क) दैनिक रोकडवही
(६) नमुना – ६ वर्गीकृत नोंदवही
(७) नमुना – ७ सामान्य पावती
(८) नमुना – ८ कर आकारणी नोंदवही
(९) नमुना – ९ कर मागणी नोंदवही
(९) नमुना – ९ (क) कराची मागणी पावती
(१०) नमुना – १० कर व फी बाबत पावती
(११) नमुना – ११ किरकोळ मागणी नोंदवही
(१२) नमुना – १२ आकस्मित खर्चाचे प्रमाणक
(१३) नमुना – १३ कर्मचारी वर्गाची सूची व वेतनश्रेणी नोंदवही
(१४) नमुना – १४ मुद्रांक हिशोब नोंदवही
(१५) नमुना – १५ उपभोग्य वस्तूसाठी नोंदवही
(१६) नमुना – १६ जडवस्तू संग्रह व जंगम मालमत्ता नोंदवही
(१७) नमुना – १७ अग्रिम दिलेल्या / अनामत रक्कमा ठेवलेली नोंदवही
(१८) नमुना – १८ किरकोळ रोकडवही
(१९) नमुना – १९ कामावर असलेल्या व्यक्तीचा हजेरीपट
(२०) नमुना – २० कामाच्या अंदाजाची नोंदवही
(२०) नमुना – २० (क) मोजमाप वही
(२०) नमुना – २० (ख) कामाचे देयक
(२०) नमुना – २० (ख -१) कामाचे देयक
(२१) नमुना – २१ कर्मचा-यांच्या देयकाची नोंदवही
(२२) नमुना – २२ स्थावर मालमत्ता नोंदवही
(२३) नमुना – २३ ताब्यातील रस्त्याची नोंदवही
(२४) नमुना – २४ जमिनीची नोंदवही
(२५) नमुना – २५ गुंतवणूक नोंदवही
(२६) नमुना – २६ (क) जमा व खर्चाचे मासिक विवरण
(२६) नमुना – २६ (ख) वर्षाचे मासिक खर्चाचे विवरण
(२७) नमुना – २७ लेखा परीक्षणातील आक्षेपाच्या पुर्तेचे मासिक विविरण
(२८) नमुना – २८ मागासवर्गीयासाठी १५ % व महिला बाल्काल्यांसाठी १० % करावयाचे खर्चाचे मासिक विवरण
(२९) नमुना – २९ कर्जाची नोंदवही
(३०) नमुना – ३० ग्राम पंचायत लेखापरीक्षण आक्षेप पूर्तता नोंदवही
(३१) नमुना – ३१ प्रवासभत्ता देयक
(३२) नमुना – ३२ रक्कामाच्या परताव्यासाठीचा आदेश
(३३) नमुना – ३३ वृक्ष नोंदवही

(१) नमुना - १ अर्थसंकल्प

पंचायतला पुढील वर्षाचा वार्षिक अर्थसंकल्प, वित्तीय वर्षाच्या ३१ तारखेस किवा त्यापूर्वी पंचायत समितीला सादर करणे आवश्यक आहे. १ एप्रिल पासून ते ३१ मार्च पर्यंत जमा-खर्च होणाऱ्या रक्कमा यांचा अंदाज या नमुन्यात नमूद करणे आवश्यक आहे. यात कर, करेत्तर उत्पन्न, अभिहस्तांकीत रक्कमा, अनुदाने, संकीर्ण जमा व प्रारंभीची शिल्लक याचा समवेश जमेत असतो तर खर्च देखील याच अनुषंगाने बाबीवर करावा लागतो. महत्वाचे खर्च म्हणजे वेतन, प्रवासभत्ता, कार्यालयीन, अस्थापना (२५ %), जिल्हा ग्रामविकास निधी (०.२५ %), मागासवर्गीय (१५ %), महिला व बालकल्याण (१० %) आणि दिव्यांग ५ %) खर्च यावर नियमानुसार तरतूद करणे आवश्यक आहे. नमुन्यात जे शीर्षक दिले तेच वापरणे आवश्यक आहे. स्वतः हाताने नाव लिहून नवीन काम किवा खर्च नमूद करण्यात येऊ नये. दिलेल्या नमुन्यात बदल करण्याचे अधिकार पंचायतीला नाहीत. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी त्यास पंचायतीच्या मासिक सभा व ग्रामसभेची मंजुरी घेणे आवश्यक आहे.

(२) नमुना - २ पुनर्विनियोजन व नियतवाटप

पंचायतीला एखाद्या बाबीवर खर्चात वाढ होत असेल किवा खर्च कमी पडत असेल तर पुनर्विनियोजन व नियतवाटप तयार करणे आवश्यक आहे. हे तयार करीत असताना मूळ अर्थसंकल्पाच्या रकमेत बदल होणार नाही याबाबात दक्षता घेणे बंधनकारक आहे. पुनर्विनियोजन व नियतवाटप सादर करीत असताना ते पंचायतीच्या सभेत ठेऊन त्याला मंजुरी घेऊन पंचायत समितीकडे मंजुरी करिता पाठवावे लागते.

(३) नमुना - ३ ग्रामपंचायत जमा व खर्च

पंचायतीला आर्थिक वर्ष संपल्यावर जमा व खर्चाचे विवरण या नमुन्यात तयार करून दप्तरी ठेवणे आवश्यक आहे. नमुन्यात जे शीर्षक दिले तेच वापरणे आवश्यक आहे. स्वतः हाताने नाव लिहून नवीन काम किवा खर्च नमूद करण्यात येऊ नये. दिलेल्या नमुन्यात बदल करण्याचे अधिकार पंचायतीला नाहीत. यात आर्थिक वर्षात होणाऱ्या जमा व खर्च याबाबत सर्व बाबवार नोंदी घेतल्या गेल्या पाहिजेत. नमुना ३ तयार करीत असताना जो नमुना लेखासंहितेत दिला व त्यात जे लेखा पंचायतीच्या पहिल्या ग्रामसभेत या जमा व खर्च विवरणाला मंजुरी घ्यावी लागते. सदर नमुण्याची एक प्रत हि पंचायत समितीकडे सादर करणे बंधनकारक आहे.

(४) नमुना - ४ पंचायतीचे मत्ते व दायीत्वे

पंचायतीला आर्थिक वर्ष संपल्यावर जमा व खर्चाचे विवरण या नमुन्यात तयार करून दप्तरी ठेवणे आवश्यक आहे. पंचातीला येणे असणाऱ्या सर्व रक्कमा ह्या मत्ता या सदराखाली तर पंचायतीला देणे असणाऱ्या सर्व रकमा ह्या दायित्व या सदराखाली येते, मत्ता व दायित्व यावरून पंचायतीची आर्थिक स्थिती लक्षात येते

(५) नमुना - ५ सामान्य रोकडवही

पंचायतीला जमा होणाऱ्या सर्व रक्कमा यांची नोंद व होणाऱ्या सर्व खर्चाची नोंद या वहीत दररोज घ्यावी लागते. ग्रामपंचायतीला जमा होणारे कर, करेत्तर रकमा, अनुदाने, फी, अग्रिम, अभीहस्ताकीत रकमा या सर्वांची नोंद जमेत दैनिक घेणे आवश्यक आहे. आणि त्यान अनुषंगाने नमुना १ च्या लेखा शीर्षक नुसार केलेले खर्च याची नोंद खर्च बाजूस घेणे आवश्यक आहे. जमाव खर्च रकमेचा ताळमेळ बँकेशी जुळवून गोषवारा काढणे आवश्यक आहे. अखेरची शिल्लक रक्कम हि अंकात व अक्षरात लिहतील. या वहीत सरपंच व ग्राम पंचायत अधिकारी यांच्या स्वाक्षरी घेऊन लेखे बंद करणे आवश्यक आहे.

(५ ) नमुना - ५ (क) दैनिक रोकडवही

दैनिक रोकड वहीत जमा होणाऱ्या सर्व राकामाची नोंद असेल. सदर रोकड वही दैनिक लिहिणे आवश्यक आहे. नमुना ७, नमुना १० य्द्वारे प्राप्त रकमा बाबत सर्व नोंदी यावाहित ठेवावे लागते. जमा झालेली दैनिक रोकड हि त्याच दिवशी बँकेत जमा करावी. अखेरची शिल्लक रक्कम हि अंकात व अक्षरात लिहतील. सदर रोकडवही सरपंच व ग्राम पंचायत अधिकारी ७ दिवसातून एकदा तपासतील व त्यावर स्वाक्षरी करतील.

(६) नमुना - ६ वर्गीकृत नोंदवही

या नोंदवहीत नमुना १ च्या लेखा शीर्षक अंतर्गत जमा झालेली व खर्च झालेल्या सर्व राकामचे वर्गीकरण तारीख निहाय असून तशा नोंदी तारीखनिहाय घेणे आवश्यक आहे. या नमुन्यातील नोंदी ह्या दैनिक दररोज घेणे आवश्यक आहे. या नमुन्यामुळे पंचायतीला लेखा शीर्षक अंतर्गत करण्यात येत असलेला खर्च हा नमुना १ च्या वर जाणार नाही याची दक्षता घेता येते व परिणामी लेखा परीक्षण व लेखा आक्षेप व वसुली सारखे परिणामाला समोर जाण्याचे धोखे टाळता येतात. नमुना ६ लिहित असताना जवळपास सर्व नमुन्याचा सार घ्यावा लागतो व सर्व नमुने अद्यावत असावे लागतात म्हणून हा नमुना म्हणजे पंचायतीचा आत्मा आहे.

(७) नमुना – ७ सामान्य पावती

पंचायतीला जमा होणाऱ्या रकमेसाठी हा नमुना वापरला जातो. सदर नमुना द्विप्रतीत असावा. पंचायतीकडे यांची एक कार्बन किवा स्थळप्रत असावी. पावती बुकावर पुस्तक व पावती क्रमांक मुद्रित किवा शिक्के मारलेले असावेत. स्वीकारलेल्या रकमेबाबत हा नमुना देणे आवश्यक आहे. शेवटच्या पावतीवर सदर नमुना प्रमाणित करून असणे आवश्यक असून या नमुन्याची नोंद नमुना १५ मध्ये घेतलेली असावी.

(८) नमुना - ८ कर आकारणी नोंदवही

पंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व कर लावण्यासाठी अधिनियमात तरतूद केलेल्या खुली जागा, इमारती. कारखाने, औदोगिक इमारती व बांधकामे व सूचित केलेल्या सर्व करपात्र बाबी यावर लावलेल्या कर आकारणीची नोंद या वहीत घेणे आवश्यक आहे. यात सर्व कराच्या मिळकतीचे वर्णन लांबी-रुंदी व क्षेत्रफळ आणि लावलेला कर यात नमूद असते . कर आकारणी हि भांडवली मूल्यावर आधारित केली जाते. कराची आकारणी दर चार वर्षांनी करणे बंधनकारक आहे. सदर नोंदवही हि सरपंच यांच्याकडून प्रमाणित केलेली असावी.

(९) नमुना - ९ कर मागणी नोंदवही

पंचायतीच्या या नोंदवहीत नमुना ८ मधील कर आकारणी केलेल्या सर्व कराच्या रकमेची यादी या नमुना ९ नोंदवहीत केलेली असते. हि नोंदवही १ एप्रिल पासून सुरु होणाऱ्या व ३१ मार्च ला संपणाऱ्या आर्थिक वर्षाकरिता असते. कराची रक्कम कर खातेधारक यांनी भरल्यावर त्याची नोंद या वहीत केली जाते.

(९) नमुना – ९ (क) कराची मागणी पावती

पंचायत नमुना ९ नुसार ज्या मिळकतीवर कर मागणी लावली जाते ती वसूल करणेकरिता हा नमुना दिला जातो. या नमुन्यात खातेदार यांना त्यांच्याकडे असलेल्या कराची मागणी बाबत माहिती व ती केव्हा पर्यंत भरावी याची माहिती असते. त्यानंतर म. ग्रा, अ. १९५८ चे कलम १२९ नुसार कार्यवाही करून वसुलीची कार्यवाही केली जाते. हा नमुना कार्बन प्रतिलिपीत असावा.

(१०) नमुना - १० कर व फी बाबत पावती

पंचायत अंतर्गत नमुना ९ नुसार मागणी केलेल्या कराच्या जमा राकामेकारिता हा नमुना कर खातेदार यांना दिलवा जातो. हा नमुना कार्बन प्रतिलिपीत असावा. यावर पावती पुस्तक व पावती क्रमांक छापलेले असावे. कर आर्थिक वर्षाच्या सहा महिन्याच्या आत भरणा केल्या करावर ५ % सवलत दिली जाते व नंतर भरल्यास थकीत करावर ५ % दंड आकारण्याची तरतूद आहे.

११) नमुना - ११ किरकोळ मागणी नोंदवही

पंचायतीच्या या नमुन्यात पंचायतीला घेणे आलेली कर व्यतिरिक्त इतर रकमेची मागणी बाबत नोंद केलेली असते. उदा. दुकान गाळे भाडे रक्कम, लिलाव रक्कम, इमारत भाडे रक्कम, जि. प./ पं. स. कडून प्राप्त अनुदाने थोडक्यात कर व फी सोडून सर्व येणे रकमा यासारख्या रकमाची मागणी या नोंद वहीत केलेली असते. प्रत्येक आर्थिक वर्षाकरिता स्वतंत्र नमुना असावा.

(१२) नमुना - १२ आकस्मित खर्चाचे प्रमाणक

पंचायतीला खर्चाची रक्कम काढावयाची असल्यास हा नमुण्यात नोंद घेऊन रक्कम काढावी किवा खर्च करावी लागते. हा नमुना म्हणजे खर्चाचे प्रमानकाचा नमुना आहे. हा नमुना तयार झाल्य्वारच देयकाची रक्कम काढता येणार नाही. घेतलेल्या वस्तू, सेवा व बांधकामे देयके वितरीत करणे याकरिता देखील या नमुन्याचा वापर करावा लागतो. तरतूद, खर्च व शिल्लक रक्कम याचा तपशील यात नमूद असतो. देयक देताना साक्षीदार यांच्या सह्या घेणे आवश्यक आहे. पुरवठाधारक यांचाय्क्डून मिळालेले सर्व साहित्य व देयक नमुना १२ ला जोडून रक्कम मंजूर करावी व देयक दिल्यावर त्यावर (चुकते करून रद्द केले) असा शिक्का मारवा. हा देयकाचा महत्वाचा नमुना आहे. प्रत्येक वित्तीय वर्षाकरिता स्वतंत्र असावा.

(१३) नमुना – १३ कर्मचारी वर्गाची सूची व वेतनश्रेणी नोंदवही

पंचायतीच्या या नमुन्यात पंचायत अंतर्गत कार्यरत कर्मचारी यांची नोंद असते. कर्मचारी नाव, नियुकी दिनक, पद व वेतनश्रेणी याबाबत अद्यावत नोंदी घेणे आवश्यक असते.

(१४) नमुना - १४ मुद्रांक हिशोब नोंदवही

पंचायतीच्या या नोंदवहीत पंचायतीला आवश्यकते नुसार खरेदी केलेले मुद्रांक यांचा हिशोब ठेवला असतो. मुन्द्रकाचे दोन प्रकार प्रामुख्याने आहेत. एक महसूल मुद्रांक (उदा. Stamp, Court Fee Stamp) आणि एक डाक मुद्रांक (Revenue Tiket). शिल्लक असलेले मुद्रांक सरपंच किमान महिन्यातून एकदा तपासतील व शेरा लिहून स्वाक्षरी करतील.

(१५) नमुना – १५ उपभोग्य वस्तूसाठी नोंदवही

पंचायतीच्या या नोंदवहीत खरेदी कलेले सर्व वस्तू याची नोंद घेतली गेली पाहिजेत. खरेदी केले अभिलेखे, पावत्या आणि नमुने याची पण नोंद घेणे आवश्यक आहे, हा नमुना प्रत्येक निधी करिता स्वतंत्र ठेवावा लागतो. वस्तूची विल्हेवाट लावताना वस्तू घेणाऱ्या कर्मचारी यांची स्वाक्षरी घ्यावी. वस्तूची तपासणी सरपंच यांनी ३ महिन्यातून एकदा करावी व पडताळणी करून वस्तू सुस्थितीत असल्याचा शेरा लिहणे आवश्यक आहे. आवश्यकता भासल्यास वर्षाच्या शेवट पडताळणी करावी.

(१६) नमुना – १६ जडवस्तू संग्रह व जंगम मालमत्ता नोंदवही

पंचायतीच्या या नमुन्यात कायमस्वरूपी किवा दीर्घकाळ टिकणाऱ्या वस्तूची (जंगम) नोंद घेतली जाते. उदा. खुर्ची, टेबल, कुलूप, नळ योजना मोटर, कपाट, वाहन, पंखा, कुलर. सरपंच यांनी सदर साहित्याची पडताळणी व तपासणी वर्षातून दोनदा म्हणजे ३० जून आणि ३१ डिसेंबर पर्यंत करावी व वस्तू सुस्थितीत असल्याचा शेरा लिहावा.

(१७) नमुना – १७ अग्रिम दिलेल्या / अनामत रक्कमा ठेवलेली नोंदवही

पंचायत कडे प्राप्त होणाऱ्या सर्व प्रतिभूती ठेवी बाबतच्या नोंदी घेण्यात याव्यात. पंचायतीच्या पूर्व मंजुरीशिवाय कोणत्याही ठेवी परत करता येणार नाही. सदर नोंदवही तील नोंदी सरपंच अनुप्रमानीत करतील.

(१८) नमुना – १८ किरकोळ रोकडवही

पंचायतीला रुपये ५०० पेक्षा कमी रकमेचे प्रदान दर्शनी धनादेशाद्वारे करता येते. त्याची नोंद नमुना १८ मध्ये जमा बाजूस घेऊन आणि खर्चाच्या बाजूस प्रत्येक व्यवहाराची नोंद घेऊन प्रमानाकाच्या आधारे रक्कमेचे प्रदान करावे. यावर सरपंच यांची स्वाक्षरी घेणे आवश्यक आहे. ग्राम पंचायत अधिकारी यांच्याकडे जास्तीत जास्त रुपये १००० स्थायी अग्रीम ठेऊ शकतो व अशा खर्चाची नोंद या नमुन्यात करावी. हा एक देयाकाचाच नमुना आहे. याची नोंद नमुना ५ वर घेण्यात यावी.

(१९) नमुना – १९ कामावर असलेल्या व्यक्तीचा हजेरीपट

पंचायतीला कोणतेही काम करायचे असेल तेव्हा कामाकरिता मजूर लावावे लागतात व त्याची दैनदिन हजेरी ठेवावी लागते, त्याकरिता या नमुन्याचा उपयोग केला जातो व यात नोंदी घेतल्या जाते. यावर हजर दिवस, मजुरी रक्कम व मजुरी मिळाल्याची स्वाक्षरी असते. सदर नमुना हा देयाकाचा नमुना असल्याने देयक मंजूर करून घेऊन यावर सरपंच यांची स्वाक्षरी आवश्यक आहे. स्वतंत्र निधी करिता स्वतंत्र नमुना ठेवावा. प्रत्येक आर्थिक वर्षाकरिता स्वतंत्र लेखे असावेत.

(२०) नमुना – २० कामाच्या अंदाजाची नोंदवही

पंचायतीच्या या नमुन्यात कामाचे अंदाजपत्रक तयार करून नोंदी घेण्यात याव्यात. तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी मिळालेल्या सर कामाची नोंद यामध्ये घेण्यात यावी.

(२०) नमुना – २० (क) मोजमाप वही

पंचायतीने केलेल्या कामाचे व पुरविलेल्या सामुग्रीच्या मोजमापाच्या नोंदी या नमुन्यात घेण्यात याव्यात. यावर अनुक्रमांक देण्यात यावा नोंद्वाहीचे शेवटचे पृष्ठ सरपंच व सचिव प्रमाणित करतील. मान्चायातीची मुद्रा यावर असणे आवश्यक आहे.

(२०) नमुना – २० (ख) कामाचे देयक

पंचायत देयके देताना या नमुना मध्ये नोंदी घेणे आवश्यक आहे. कामाचे नाव, तांत्रिक मंजुरी, कंत्राटदार किवा पुरवठादार नाव, कंत्राट क्रमांक, कामाचे वर्णन याबाबत नोंदी घेऊन सरपंच व ग्राम पंचायत अधिकारी स्वाक्षरी करतील.

(२०) नमुना – २० (ख -१) कामाचे देयक

पंचायत बांधकामाच्या खर्चाचे देयक या नमुन्यात तयार करतील. देयकातील परिणामे मोजमाप वहीतील पडताळणी करून घ्यावी. मोजमापे करणारे अभियंता, देयके घेत असलेले कंत्राटदार यांच्या स्वाक्षरी यावर असणे आवश्यक आहे. त्यानंतरच देयके प्रदान करावे. सरपंच व ग्राम पंचायत अधिकारी स्वाक्षरी करतील.

(२१) नमुना – २१ कर्मचा-यांच्या देयकाची नोंदवही

पंचायतीच्या कर्मचारी यांचे वेतन व भत्ते यांचे देयक या नमुन्यात करावे लागते. यात त्यांचे वेतन व भत्ते व ते मिळाले बाबत त्यांची स्वाक्षरी घेण्यात यावी. सरपंच व ग्राम पंचायत अधिकारी देयक मंजूर करून स्वाक्षरी करतील.

(२२) नमुना – २२ स्थावर मालमत्ता नोंदवही

पंचायत त्यांच्या मालकीच्या असलेल्या स्थावर मालमत्ता यांच्या नोंदी यात ठेवतील. पंचायत अंतर्गत असलेल्या मालकीच्या इमारती, विहिरी, पाण्याची टाकी, दुकान गाळे किवा तत्सम मालमत्ता, खरेदी केलेली मालमत्ता, मालमत्ता उभारणी दुरुस्त्या यांच्या नोंदी यात घेणे आवश्यक आहे. सर्व स्थावर मालमत्ता यांची तपासणी दरवर्षी एप्रिल महिन्यात करून नोंदवही व्यवस्थित ठेवली असून त्यातील नोंदी सरपंच यांचे स्वाक्षरीने प्रमाणित करतील.

(२३) नमुना – २३ ताब्यातील रस्त्याची नोंदवही

पंचायत पंचायतीच्या हद्दीतील सर्व रस्त्याची नोंद नमुना २३ मध्ये ठेवतील.रस्त्याचा प्रकार लांबी, रुंदी बाबत तपशील लिहावा,पंचायत या रस्त्याची कामे जेव्हा जेव्हा करतील तेव्हा तेव्हा यात नोंदी घेण्यात याव्यात.सरपंच यान याची खातरजमा व पडताळणी करून या नमुन्यात स्वाक्षरी करतील.

(२४) नमुना – २४ जमिनीची नोंदवही

पंचायत पंचायत समिती, जिल्हा परिषद. शासनाने खरेदी किवा संपादित केलेल्या व हस्तांतरित केलेल्या सर्व जमिनी तसेच सर्व मोकळ्या जागा, पडीक जमिनी, गायरान जमिनी, खातकुडा, मुर्दे गाडणे जमिनी किवा इतर हस्तात्रीत सर्व जमिनीची नोंद या नोंदवहीत ठेवतील. सर्व जमिनीचे ७/१२ दप्तरी ठेवतील. अशा प्रत्येक जमिनीची नोंद स्वतंत्र पानावर करावी. सरपंच सदर नोंदी प्रमाणित करतील व त्यावर स्वाक्षरी करतील.

(२५) नमुना – २५ गुंतवणूक नोंदवही

पंचायत महारष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता २०११ नियम १५ नुसार पंचायतीला ग्राम्निधीतील रक्कम ठेवी स्वरुपात ठेवता येईल. तसेच राज्य किवा केंद्र शासनाने काढलेल्या रोख्यात गुंतविता येईल. ह्या गुंतविलेल्या सर्व नोंदी या नमुन्यात घेणे बंधनकारक आहे. सामान्य रोकड वही नमुना ५ वहीतील अखेरची शिल्लक रकमेचा मेल गुंतवणूक नोंद्वाहीशी घेण्यात यावा. प्रत्येक नोंद सरपंच प्रमाणित करतील.

(२६) नमुना – २६ (क) जमा व खर्चाचे मासिक विवरण

प्रत्येक महीन्याचे मासिक हिशोब पूर्ण केल्यावर ग्राम पंचायत अधिकारी यांनी या नमुन्यात जमा व खर्च मासिक विवरणपत्र तयार करून पंचायत समितीला महिन्याच्या १५ तारखेपर्यंत पाठविणे बंधनकारक आहे.

(२६) नमुना – २६ (ख) वर्षाचे मासिक खर्चाचे विवरण

प्रत्येक महीन्याचे मासिक हिशोब पूर्ण केल्यावर ग्राम पंचायत अधिकारी यांनी या नमुन्यात खर्च मासिक विवरणपत्र तयार करून पंचायत समितीला महिन्याच्या १५ तारखेपर्यंत पाठविणे बंधनकारक आहे. याचा मेल नमुना ५ सोबत जुळणे आवश्यक आहे.

(२७) नमुना – २७ लेखा परीक्षणातील आक्षेपाच्या पुर्तेचे मासिक विविरण

पंचायत त्यांचे लेखापरीक्षण अहवाल प्राप्त झाल्यावर लेखा परीक्षण अहवाल दोन महिन्याच्या आत पंचायतीला पाठविण्यात येते. पंचायतीने तीन महिन्याच्या आत पूर्तता करून पंचायत समितीला अनुपालन अहवाल सादर करणे आवश्यक आहे. लेखापारीक्षण अहवालातील परिच्छेद संख्या, महिन्यात सादर केलेले अनुपालन, मान्य केलेल्या आक्षेपाची संख्या, प्रलंबित आक्षेपाची संख्या बाबत तपशील विवरणपत्र या नमुन्यात करून दे दरमहा पंचायत समिती कडे पाठविणे आवश्यक आहे.

(२८) नमुना – २८ मागासवर्गीयासाठी १५ % व महिला बालकल्याणसाठी १० % करावयाचे खर्चाचे मासिक विवरण

पंचायत मागासवर्गीयसाठी १५ % खर्च व महिला बालकल्याणसाठी १० % खर्च मासिक प्रगती अहवाल या नमुन्यात तयार करून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पंचायत समितीला सादर करणे आवश्यक आहे. पंचायत समिती नियमाचे पालन करून सदर खर्च होईल याची पडताळणी करतील.

(२९) नमुना – २९ कर्जाची नोंदवही

पंचायत पंचायतीने घेतलेले कर्ज, व्याजाची व मुद्दलाची केलेली परतफेड याची नोंद या नमुन्यात घेणे आवश्यक आहे. या नोंद वहीतील नोंदी सरपंच यांनी दर तीन महिन्यातून एकदा पडताळून पाहल्या पाहिजेत व स्वाक्षरी केली पाहिजेत.

(३०) नमुना – ३० ग्राम पंचायत लेखापरीक्षण आक्षेप पूर्तता नोंदवही

पंचायत लेखा परीक्षणातील आक्षेप व त्याचे अनुपालन याची नोन या नमुन्यामध्ये ठेवणे आवश्यक आहे. आक्षेप संख्या, पूर्तता केलेले आक्षेप संख्या, मंजूर केलेले आक्षेप संख्या, वसुली, नियमबाह्य खर्च याची माहिती यात नोंद करणे आवश्यक आहे. आक्षेपाचे अनुपालन ठराव घेऊन सादर करणे आवश्यक आहे.

(३१) नमुना – ३१ प्रवासभत्ता देयक

पंचायत पंचायतीचे पदाधिकारी यांचे प्रवास भत्ते देयके या नमुन्यात तयार करतील. प्रवासाच्या सर्व नोंदी व तपशील नोंद करून देयक मंजूर करून अदा करण्यात यावे. हा देयाकाचा नमुना आहे.

(३२) नमुना – ३२ रक्कामाच्या परताव्यासाठीचा आदेश

पंचायत कडे ठेवण्यात आलेल्या ठेवीच्या परताव्याचे देयक या नमुन्यात तयार करावयाचे असून खाली रक्कम स्वीकारणाऱ्याची स्वाक्षरी घेण्यात यावी. हा नमुना देयाकाचा नमुना आहे.

(३३) नमुना – ३३ वृक्ष नोंदवही

पंचायतीच्या जमिनीवर व रस्त्यालगत असलेल्या सर्व प्रकारच्या झाडांची नोंद या नोंदवहीत करायची आहे. या वृक्षापासून मिळणाऱ्या उत्पन्नाची (उदा. फळबाग, सागाचे वन, बांबूचे वन यांच्यापासून मिळणारे उत्पन्न) नोंद नोंदवहीत घेणे आवश्यक आहे. नैसर्गिक हानी झाली असेल किवा वृक्ष पडले किवा तोडले गेले असेल त्याची नोंद या नमुन्यात घ्यावयाची आहे.

वरील प्रमाणे १ ते ३३ (1 te 33 namune) नमुने महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता २०११ च्या नुसार ग्रामपंचायतीचे लेखे ठेवणे आवश्यक आहे.अधिक तपशील करिता महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता २०११ संदर्भ घ्यावा व त्यानुसार कार्यवाही करावी.

  • All Posts
  • अभियान बाबत
  • माहिती जाणून घ्या...!
  • योजना बाबत
Jayanti Utsav Grampanchayat NOC

February 14, 2026/

Jayanti Utsav Grampanchayat NOC Jayanti Utsav Grampanchayat NOC 2026 कशी घ्यावी? संपूर्ण प्रक्रिया, कागदपत्रे, अर्ज नमुना आणि नियम Chatrapati Shivaji...

GP Other Record

December 19, 2025/

GP Other Record GP Other Record महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता २०११ नुसार ठेवणे आवश्यक आहे. पंचायतला १ ते ३३ नमुन्यात अद्यावत...

Itar Namune

December 14, 2025/

Hot News Jayanti Utsav Grampanchayat NOC निवडणूक प्रचार सभा व रॅली नाहरकत प्रमाणपत्र नमुने ग्रामपंचायत अर्थसंकल्प तयार कसे करावे ?...

e-tender

December 7, 2025/

Hot News Jayanti Utsav Grampanchayat NOC निवडणूक प्रचार सभा व रॅली नाहरकत प्रमाणपत्र नमुने ग्रामपंचायत अर्थसंकल्प तयार कसे करावे ?...

TENDER

December 7, 2025/

Hot News Jayanti Utsav Grampanchayat NOC निवडणूक प्रचार सभा व रॅली नाहरकत प्रमाणपत्र नमुने ग्रामपंचायत अर्थसंकल्प तयार कसे करावे ?...

Load More

End of Content.

Scroll to Top